मार्तंड
भैरव अवतार कथा
कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा
मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत
करीत होते.त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल
पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले,त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली.अशा रीतीने त्या
नंदनवनाची वाताहत लावून मल्लासुर आपल्या दैत्यसेनेसह निघून
गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास
शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परिसरात आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून
इंद्र देवाकडे गेले . इंद्र
देवाकडे आपले दुःख व्यक्त
करून अभय मागितले.तेव्हा देवेंद्राने मल्लासुर व मणीसूर दैत्य बंधूंना ब्रम्हदेवा कडून मिळालेला अजेयत्वाच्या
वरदानाचा वृतांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित
केली.त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णुंची मदत
घेण्यासठी सुचविले,दुर्दैवाने विष्णुंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्मऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले.ऋषीमुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपल्या
जटा आपटल्या, त्याबरोबर त्या उर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषी मुनींनी घृत
अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे
पडले.मणी-मल्ल दैत्यांचा
संहार करण्यासाठी महादेवांनी
सुर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले.गळ्यात सर्पभूषणे,कानात कुंडले,हातात त्रिशूल,डमरू,खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होवून , कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्त कोटि गणांसह धवलगिरीवर
अवतरले.
या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी
प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून
ओळखला जावू लागला.मल्लासूराला दूतांकरवी हि वार्ता समजल्या नंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला.त्याने आपले
धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली,दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घनघोर युद्धास सुरवात झाली.मार्तंड भैरवाच्या देव सेनेने
राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच,मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले.कार्तिकस्वामीने त्याचा पराभव करून त्याला
ठार केले.त्यानंतर येणा-या प्रत्येक दैत्याचा संहार
देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कांमुखाचा श्रीगणेशाने
तर कुंतलोमाचा महानंदीने
पराभव करून त्यांना ठार केले.
दैत्य
सेनेचा पराभव पाहून
मल्लासुर क्रोधिष्ठ झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणीसूराला रणांगणावर पाठविले, त्याचा संहार करण्यासाठी
मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले.सुरवातीच्या घणाघाती
युद्धानंतर मार्तंड
भैरवाने त्रिशूल व खड्ग
आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या
पदस्पर्शाने मणी दैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून
इष्ट वरदान देण्याचे वचन
घेतले, "प्रभो,तुझे चरणाखाली माझे शीर असावे तसेच माझे
अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे". मणीसूराच्या भक्तीने
संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासूरास जीवदान
देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले.दुराग्रही व
अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य
केला नाही याउलट आपल्या
प्रचंड सेनेचा व
सहका-यांचा संहार पाहून क्रोधीत झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले.
त्यावर
देवसेनेतर्फे घृतमारी
युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व
अस्त्रांसह महायुद्ध
झाले.बराचवेळ चाललेल्या
युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग
झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा
घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ
आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व
देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर
तो म्हणाला " हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर
असावे." मणीसूर व मल्लासूर दैत्यांना
पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय
मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती
म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद
देणारा असा सदानंद
येळकोट येळकोट जय मल्हार