या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत........ WELCOME TO RATNGAD DEVSTHAN SHINDWAD

आख्यायिका

                                                        एक  आख्यायिका 

 

गोष्ट फार पूर्वीची आहे . एक वाटसरू आपल्या प्रवासाला निघाला होता . रस्त्याने  चालून चालून थकला होता . सूर्य मावळतीला आलेला . आता पुढचा प्रवास करणे अशक्य वाटू लागले होते तरीही तो चालत होता . रात्रीच्या मुक्कामाची काही सोय होईल म्हणून जागा शोधत होता . पण अनोळखी मुलुख कुणाकडे जावे ? पायातले त्राण संपलेले . काय करावे काही सुचेना . शेवटी चालत चालत एका डोंगराच्या पायथ्याशी आला .डोंगरावर कसलेतरी देऊळ होते . आता पर्यंत पूर्ण दिवस मावळला होता . आजूबाजूला किर्र जंगल . मनात भीती भरलेली . काही अंतरावर गाव असाव पण तिथं जाऊन कुणाकडे जायचं ? ना ओळख ना पाळख . शेवटी निश्चय केला . याच डोंगराच्या पायथ्याशी रात्र काढायची . जे व्हायचे ते होईल . ती चैत्र पौर्णिमेची रात्र होती . चंद्राचे पांढरेशुभ्र चांदणे पडले होते . त्या प्रकाशात डोंगर शोभून दिसत होता . वाटसरुने भक्तिभावाने देवाला हात जोडले तो एका झाडाखाली आडवा झाला . जवळच पडलेला एक दगड त्याने उशाला ओढला . दिवसभर थकल्याने तो क्षणार्धात झोपी गेला . सकाळी उठला तेव्हा उन्हे बरीच वर आली होती . आपण सुखरूप आहोत हे पाहून तो आनंदून गेला होता . पुन्हा एकदा त्या डोंगरावरच्या देवाला नमस्कार करून तो पुढच्या प्रवासाला जायला निघाला . निघताना देव जाणे का पण त्याने रात्री उशाला घेतलेल्या दगडाचा एक तुकडा सोबत घेतला . कदाचित या रात्रीची आठवण म्हणून . घरी पोहचल्यावर त्याने त्याने तो खडा घरातील एका खात्यात ठेऊन दिला . रात्र झाली . आज तो स्वत :चे घरी असल्याने शांत झोपी गेला . दिव्याचा अंधुक प्रकाश होता . मध्यरात्र उलटून गेली .तो झोपेतून जागा झाला . डोळे उघडून पहिले तर घरात लख्ख प्रकाश पसरलेला . कसला प्रकाश आहे म्हणून तो पाहू लागला . त्याने डोंगराच्या पायथ्याहून आणलेल्या खड्याचे रत्न बनले होते . त्याने लगबगीने बायकोला उठवले घडलेला सारा प्रकार सांगितला . दोघानांही खूप आनंद झाला . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते दोघेही त्या डोंगरावरच्या देवाचे दर्शन घेण्यासाठी आले . मोठ्या भक्तिभावाने डोंगर चढून गेले . मंदिरात जाऊन पहिले तर त्यांना ते खंडेरायाचे स्थान असल्याचे समजले . त्यांनी हा प्रकार या गावातील लोकांना सांगितला . इथले खडे रत्न होतात म्हणून तो डोंगर रत्नगड याच नावाने ओळखला जाऊ लागला .