देव्हाऱ्यातील देव
आपल्या देव्हाऱ्यातील देव म्हणजेच टांक . सर्वसाधारणतः टांक हे चांदीचे, पितळेचे आणि तांब्याचे असतात. तांब्यावर चांदीचा पातळ तुकडा ठेवून बनविलेले टांक विशेष प्रचलित आहेत. चांदीच्या तुकड्यावर साच्याच्या सहाय्याने देवतेच्या मूर्तीचा ठसा उमटवतात आणि मग हा चांदीचा तुकडा तांब्याच्या तुकड्यावर बसविला जातो आणि सर्व बाजूने तो तांब्याच्या तुकड्यात सांधला जातो. त्यामुळे त्याला भक्कमपणा येतो.नित्य पूजेसाठी टांक तयार करवून आपल्या देव्हार्यात ठेवतात. खंडोबा हा घोड्यावर असून त्याच्या मागे त्याची पत्नी म्हाळसाई बसली आहे आणि खंडोबाच्या हातात शस्त्रे असून घोड्याच्या खालच्या बाजूला एक कुत्रा आहे. खंडोबा या दैवताची पारंपरिक कथा या टांकात चित्रित झाली आहे.
घरामध्ये शुभकार्य प्रसंगी नविन टांक बनविले जातात, अथवा उजळले जातात.विशेषत: घरच्या जावई व लेकीच्या हस्ते सवाद्य मिरवणूक काढून गावात टांक मिरवले जातात व नंतर त्यांची देव्हाऱ्यात स्थापना केली जाते .